अभिनंदन व शुभेच्छा !
- jayashreedesaii
- Jul 31, 2020
- 3 min read
आज बाळासाहेब हवे होते! माझ्या मनात खूप संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. बाळासाहेब असते तर त्यांची प्रतिक्रिया आज नक्की कशी झाली असती?
स्वतः सत्ताकारण न करता सत्ताधीशांवर रिमोट कंट्रोल चालवणं ही त्यांची कार्यपद्धती होती. ती बरोबर होती हे मला अनेकदा वाटलेलं आहे. कारण त्यामुळेच कोणताही दोष स्वतःच्या माथी न घेता, 'मी सांगत होतो ...माझं मनोहर जोशींनी ऐकलं नाही' किंवा 'मी हेच सांगत होतो, पण ऐकत नाहीत माझं ' असं म्हणायला ते मोकळे राहत होते. म्हणजे श्रेय त्यांचं आणि अपश्रेय सरकारचं.....असा धूर्तपणा त्यामागे होता. त्यात, दुसरं म्हणजे आपल्या समाजाला त्यागाचं आकर्षण आहेच! त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत असतानाही त्यांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं याचं लोकांना कोण कौतुक!
मात्र ते गेले आणि ‘मातोश्री’चं ते वजनही गेलं. हे कदाचित उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळच्यांच्या लक्षात आलं नाही. म्हणूनच देशाचे गृहमंत्री व केंद्रात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपापेक्षा निम्म्या सीट्स मिळवलेल्या शिवसेनेच्या प्रमुखाकडे वाटाघाटी करण्यासाठी यायला हवं होतं, असा बाल हट्ट धरला गेला. त्यामुळेच भाजपकडूनही ताठर भूमिका घेतली गेली. निवडणूकपूर्व युती तुटली. ३० वर्षांचे मित्र वेगळे झाले. दोन पक्षांचं सरकार असतं, तर कदाचित शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आलं नसतं, पण जास्त खाती व जास्त महामंडळं पदरात पडली असती. जी जहरी टीका झाली, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी राहिली, मुख्यमंत्रिपदाच्या एका दावेदारालाच मिठाची शपथ द्यावी लागली, ते झालं नसतं.
मात्र हे सगळं होऊनही मला उद्धवजींचं कौतुक करावंसं वाटतं. ते स्वतः सत्ताकारणात उतरून छातीवर वर झेलायला तयार झाले आहेत, गेल्या काही दिवसांत तर झेलतच आले आहेत. ते मनाने सज्जन आहेत. मृदू स्वभावाचे आहेत. शिवसेनेचा जो मूळ, आक्रमक स्वभाव होता त्याच्या विपरीत त्यांचा स्वभाव आहे. तरीही त्यांनी ही जी प्रचंड मोठी धाडसी खेळी केलेली आहे त्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. काळ बदलतो, परिस्थिती बदलते तसं बदलावं लागतंच.
महाराष्ट्रात बाळासाहेब व प्रमोद महाजन यांनी जेव्हा भाजप-शिवसेना युती घडवली तेव्हा भाजपला राष्ट्रीय राजकारणात जास्त रस होता व शिवसेनेला राज्याच्या राजकारणात. त्यामुळे भाजप हा देशात मोठा भाऊ व राज्यात शिवसेना हा मोठा भाऊ अशी तडजोड दोघांमध्ये झालेली होती. ती परिस्थिती आता राहिलेली नाही. भाजपा केंद्रात सत्तारूढ झाला तसाच राज्यातही तो स्वबळावर सत्तेत येऊ शकला होता. त्यामुळे भाजपने राज्यातलं धाकुटपण सोडलं. पण शिवसेना अजूनही त्याच भूमिकेत राहिली. त्यात आता ना बाळासाहेब राहिले, ना प्रमोद महाजन. ‘राजकारण खूप बिघडलंय’ असं म्हणत अश्रू ढाळायची वेळ अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत आल्यानंतर जुनेच आग्रह टिकवून धरत तसंच वागणं हे काळाला धरून नव्हतं. आपण सगळ्यांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की काळ व परिस्थिती बदलते, तसं माणसालाही बदलावं लागतं. नेत्याला तर लागतंच. राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्र वा कायमचा शत्रू नसतो हे आपण सगळ्याच पक्षांबाबत बघितलं आहे. राज्यावर पुन्हा निवडणुका थोपण्याऐवजी त्यांनी पुढचा विचार करून, पण शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी नेटाने लावून धरत अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे सरकार अस्तित्वात आणले. शपथ घेताना त्यांच्या चेहऱ्यावर ज्या भावना होत्या आणि राज्यभर शिवसैनिकांचा जो आनंद व्यक्त होत होता त्याचा आदर आपण करायला हवा.
ते आता फक्त शिवसेनेचे नेते राहिलेले नाहीत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पूर्ण कार्यकाळ उपभोगून जनतेच्या आकांक्षा पूर्ण कराव्यात अशा सदिच्छाही द्यायला हव्यात.
या प्रसंगी मला नवशक्तीकार ज्येष्ठ लेखक कै. प्रभाकर पाध्ये यांची आठवण होते आहे. मी पुण्याहून जेव्हा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा ते आम्हाला शिक्षक होते. त्यांनी सांगितलेला हा किस्सा आहे.
ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते. 9 ऑगस्ट १९४२ला मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेसचा भव्य मेळावा पार पडला. त्याच मेळाव्यात गांधीजींनी ब्रिटिशांना 'चले जाव' चा इशारा दिला. पाध्ये सर सांगत होते की त्या मेळाव्यात गांधीजींवर सडके टोमॅटो, अंडी फेकण्यासाठी आणि तो मेळावा उधळून लावण्यासाठी ते व कम्युनिस्ट पक्षाचे इतर काही कार्यकर्ते तेथे गेले होते. मात्र गांधीजींप्रति आदरभाव ठेवून, अत्यंत शांततेत तिथे जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहून, त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही या जाणिवेने ते व त्यांचे सहकारी परत आले.
ही राजकीय प्रगल्भता आज दुर्दैवाने दिसत नाही. मात्र ती दाखवायला हवी. आपले व्यक्तिगत विचार बाजूला ठेवून येणाऱ्या नवीन सरकारचं स्वागत करायला हवं. त्यांना शुभेच्छा द्यायला हव्या.
उद्धव ठाकरे यांच्याशी माझा संबंध बाळासाहेब असल्यापासून आला. बाळासाहेब मला मुलीसारखं मानत होते. त्यावेळी त्यांच्या घरी मला ‘अपॉइंटमेंट’शिवाय जाता येत होतं. ते गेल्यानंतर व उद्धव यांनी पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतरही खूपदा त्यांच्याशी संपर्क आला. 'हवाई मुलुखगिरी' हे त्यांच्या फोटोंचं व मिलिंद गुणाजी यांनी शब्दबद्ध केलेलं पुस्तक आम्ही मैत्रेय प्रकाशनातर्फे प्रकाशित केलं, त्याहीवेळी त्यांचा संबंध आला. द्वारकानाथ संझगिरी यांचे 'माझी बाहेरख्याली ' हे पुस्तक उद्धवजी व मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते प्रकाशित झालं. त्या निमित्त त्यांच्या गप्पांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्याही वेळेला त्यांच्याशी जवळून संबंध आला आणि अगदी अलीकडे गेल्या सरकारमधील उद्योगमंत्री व विद्यमान सरकारमधील नवनियुक्त मंत्री सुभाष देसाई यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन उद्धवजींच्या हस्ते झालं. त्याही वेळी त्यांची भेट झाली.
अतिशय सज्जन, कुटुंबवत्सल असा हा नेता आहे. त्यांचं संघटन कौशल्य नाशिकमधील शिवसेना मेळाव्या पासून प्रकर्षाने पुढे येत राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करेल अशी आशा आपण बाळगू या.
त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक जण कायदेशीर कारवाईत अडकलेले आहेत...असतील. तसंच कोणतीच गोष्ट समान नसणाऱ्या या तीनही पक्षांचं सरकार चालवणं ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असेल हे मान्य. पण ते त्यातून कुशलपणे मार्ग काढतील. ही महाविकास आघाडी घडवून आणणारे शरद पवार त्यांच्या सोबत आहेतच. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभेल व हे सरकार चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त करूया व त्यांना शुभेच्छा देऊया!
Comments