उद्धव अजब तुझे सरकार!
- jayashreedesaii
- Jul 31, 2020
- 2 min read
हिंदूहृदयसम्राट म्हणून ज्या बाळासाहेब ठाकरे यांना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले त्याच बाळासाहेबांचा सुपुत्र राज्यात सत्तेवर असताना पालघरजवळ २ निःशस्त्र साधूंची ज्या निर्घृण पद्धतीने हत्या झालीय ती शहारे आणणारी आणि झोप उडवणारी आहे. राज्यात लॉक डाऊन सुरु आहे आणि तरीही अशा वेळी सुरतला आपल्या गुरूच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या जुना आखाड्याच्या २ साधुंना शंभर- दीडशेचा जमाव घेरतो, काठ्या, कोयते, दगड यांनी मारतो आणि पोलीस काहीही करत नाहीत एवढंच नव्हे तर १६ तारखेची ही घटना सरकार २ दिवस लपवून ठेवते आणि सोशल मिडीयावर त्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्यावर मग आपण त्वरित कारवाई करून १११ लोकांना ताब्यात घेतल्याचा शहाजोगपणा मिरवते हे चीड आणणारं आहे...माणुसकी शाबूत असलेल्या तिथल्या कुणी तरी हे व्हिडियो शूटिंग केलं नसत तर कदाचित ही घटना आपल्याला कळलीच नसती.......
करोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी दाखवत असलेली पारदर्शिता इथे कुठे लयाला गेली?
आणि पारदर्शिता नाही ती नाही, मुळात राज्यात कायद्याचे राज्य तरी आहे?
किती घटनांचा पाढा वाचायचा?
राज्य सरकारमधील एक जबाबदार मंत्री त्याच्यावर सोशल मीडियातून अश्लाघ्य टीका करणाऱ्या एका अभियंत्याला पोलिसांकरवी उचलून आपल्या बंगल्यावर आणतो, त्याला मंत्री महोदयांचे कार्यकर्ते मंत्री महोदयाच्याच उपस्थितीत बेदम मारतात ....पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात....
राज्यात सर्वत्र वैद्यकीय व्यावसायिक आणि पोलिसांवर जीवघेणे हल्ले होतायत....अगदी काकांच्या बारामतीमध्ये सुद्धा!
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान व अर्थातच शिवसेनेचा गड असलेल्या बांद्रा स्थानकापाशी अचानक १५ हजारांचा जमाव जमतो आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला तो जमेपर्यंत त्याची खबर सुद्धा लागत नाही....
ज्या पालघरजवळील गडचिंचले गावाजवळ १६ तारखेला या २ साधूंची हत्या झाली, त्याच गावाजवळ या घटनेच्या दोनच दिवस आधी विश्वास वळवी नावाच्या डॉक्टरच्या गाडीवर जमावाने असाच हल्ला केला होता. मात्र त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले ...मात्र त्या नंतर सुद्धा तिथे बंदोबस्त वाढवला गेला नाही की या भागात दरोडेखोरांची व मुलं पळवणाऱ्यांची टोळी फिरते आहे ही आदिवासीच्या मनातली भीती दूर करण्यासाठी काहीही केलं गेलं नाही. त्या टोळीला पकडण्यासाठी आदिवासी हातात त्यांची शस्त्रं घेऊन रोज रात्री गस्त घालत होते आणि जवळच असलेल्या पोलीस चौकीतून ते थांबवायचा प्रयत्नही झाला नाही? अशी टोळी फिरतेय ही अफवाही म्हणे व्हाटस अपच्या माध्यमातून पसरली होती. मग पोलिसांच्या सायबर विभागाने काहीच केलं नाही? त्या अफवेचा उगम शोधता आला नाही?
त्याचंच पर्यवसान शेवटी या साधुंच्या निर्घृण हत्येत झालं!
हे राज्य सरकारच्या गृह खात्याचं संपूर्ण अपयश आहे!
सरकार वेळीच जागं झालं असतं तर ही महाराष्ट्राच्या गौरवला काळिमा फासणारी घटना टाळता आली असती ....ते बिचारे साधू व त्यांच्या गाडीचा चालक हे तिघे वाचले असते
पण कदाचित या सरकारचे प्राधान्य क्रम वेगळे असावेत ...
ज्या सरकारच्या गृह विभागाचे मुख्य सचिव वाधवा यांच्यासारख्या मोठ्या आर्थिक गुन्हेगाराच्या संपूर्ण कुटुंबाच्या महाबळेश्वर सहलीसाठी परवाना पत्र देण्यात व्यस्त राहतात तिथे सर्व सामान्यांनी मरायचंच ......
असं...नाही तर तसं......
एक तर करोना मुळे....नाही तर कायदा व सुव्यवस्था नावाची काही चीजच महाराष्ट्रात शाबूत राहिलेली नसल्याने सशस्त्र जमावाच्या हल्ल्यात ....
तरीही मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडून राजीनामा मागणार नाहीत .....मागूच शकणार नाहीत....शेवटी त्यांना त्यांची खुर्ची टिकवायची असेल तर सक्षमतेचा व पारदर्शित्वाचा देखावा करत राहणं गरजेचंच आहे!
‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाजलेल्या गाण्यातल्या दोन ओळी आहेत.....
इथे फुलांना मरण जन्मता
दगडांना पण चिरंजीविता......
तेव्हा आता त्या साधुंच्या निर्घृण हत्येसारख्या घटनांनी अस्वस्थ होणं...संतापणं ...वगैरे सोडून देऊ या.... दगडांचा जयजयकार करण्याची सवय लावून घेऊ या ......आता या महाराष्ट्रात राहायचं तर त्याचीच गरज आहे !
ही आता संतांची ...भगव्याची भूमी राहिली नाही!
हा भगवा आता निरपराधांच्या रक्ताने लाल झाला आहे!
-----------------------------
Comments