top of page
Search

जिवलग श्रावण!

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read

श्रावण मला अनेक अंगांनी भेटतो ... कधी धारांतून...कधी वाऱ्यातून.. कधी लवलवत्या पात्यातून तर कधी सर्दावलेल्या हवेतून, कधी मातीच्या गंधातून तर कधी पायवाटांवर चुकार मुलांप्रमाणे धावणाऱ्या ओढ्यांतून.... कधी दुथडी भरून वाहणाऱ्या नदी नाल्यांतून तर कधी कोसळणाऱ्या धबधब्यातून... श्रावण मला अनेक अंगांनी भेटतो ... कधी ऊन पावसाच्या खेळातून तर कधी आभाळात अवचित दिसणाऱ्या इंद्रधनूतून ... कधी ओव्यांतून..कधी गाण्यांतून ...कधी झाडांना बांधलेल्या झोपाळ्याच्या तालातून.... तर कधी साठलेल्या पाण्यात दिमाखात चालणाऱ्या कागदाच्या होड्यांतून ... कधी श्रावणी सोमवारी घुमणाऱ्या लघु रुद्राच्या मंत्रांतून तर कधी मंगळागौरीच्या खेळांतून... श्रावण मला अनेक अंगांनी भेटतो कधी तो नागोबाच्या रुपात समोर येतो तर कधी शिवाच्या रुपात भेटतो... कधी भावाच्या रुपात साद घालतो तर कधी माहेरच्या वाटांच्या रुपात ओढ लावतो... कधी तो बालकवींच्या शब्दांत ‘श्रावण मासी हर्ष मानसी ....’ म्हणत आपल्याच आनंदाचा उद्गार बनतो तर कधी पाडगावकरांच्या शब्दात ‘रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात, प्रियावीण उदास वाटे रात’ असं म्हणत विरहिणीचा व्याकूळ सूर छेडतो ... श्रावण मला अनेक अंगांनी भेटतो... जसा तो कवितांतून, भावगीतांतून भेटतो तसाच कधी तो विविध रागांत बांधलेल्या बंदिशीतून भेटतो... कधी तो नृत्याविष्कारातून भेटतो तर कधी तो कुणाच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर वा कधी चक्क छत्रीवर उमटताना दिसतो... कधी तो पानांच्या सळसळीतून भेटतो तर कधी मान वर धरायला लागलेल्या भाताच्या रोपांमधूनही दिसतो ... श्रावण खरोखरच मला अनेक अंगानी भेटतो... पण मलाच का? माझं हे ऐकत असताना तुम्हालाही तो साद घालत असेल...अनेक आठवणींच्या रूपांत त्याने तुमच्याही मनात गर्दी केली असेल....लहानपणापासून त्याने केलेली सोबत, तुमच्याही जीवनात फुलवलेला आनंद तुम्हालाही आठवत असेल.... कधी कधी मनात प्रश्न येतो...धबाधबा कोसळणारा, हिरवाई फुलवणारा आषाढ कालिदासाला जेवढा आपलासा वाटला तेवढा तो कवींना, चित्रकारांना, तुम्हा -आम्हाला का आपलासा वाटत नाही? या सगळ्यांचा तसंच आपला लाडका श्रावणच का असतो? तेव्हा पाऊस कमी होऊन सृष्टी हिरवं लेणं लेऊन नटलेली असते म्हणून? वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाह जरा स्वच्छ होऊन त्यांच्या खळखळाटाला एक नादमयता प्राप्त झालेली असते म्हणून? का आपल्या आयुष्याचा आरसा म्हणता येईल असा ऊन पावसाचा खेळ तेव्हाच सुरु झालेला असतो म्हणून? खरंच ...पण या ऋतू चक्रात व आपल्या आयुष्याच्या चक्रात किती समानता असते नाही? आपल्याही आयुष्यात कधी दुःखाचा आषाढ धबाधबा कोसळत असतो ...पुढचा मार्गच दिसत नाही इतकी हवा कुंद झालेली असते....सारे मार्ग बंद झाल्यासारखेच वाटत असतात...मनाला व्याकूळ हुरहूर लागलेली असते...अशाच वेळी कुठून तरी सुखाची चाहूल लागते...श्रावणात अवचित उमटणाऱ्या उन्हाच्या तिरीपेसारखीच....मग हळुहळू आषाढाचे म्हणावे असे दुःखाचे काळे ढग पांगायला लागलेले दिसतात...आकाश हळूहळू निरभ्र व्हायला लागते...सुखाची पालवी सुखद वाऱ्याच्या झोताबरोबर डोलायला लागते....सुवार्तांची नाजूक शीळ आसमंतात घुमायला लागते...गाण्यांच्या लकेरी फक्त कानावरच पडतात असं नाही तर त्या मनातही उमटू लागतात आणि आपल्याही अवकाशात सुखाचे इंद्रधनू उमटते..... म्हणून मला श्रावण आवडतो! बाहेर ऋतू कोणताही असो ...श्रावण कायमच माझ्या मनात वसतीला असतो !

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page