top of page
Search

दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले!

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 2 min read

जयश्री देसाई


कसोटीच्या प्रसंगी एक राष्ट्र म्हणून आपण कसे वागतो यावर त्या राष्ट्राची ओळख आणि त्याचं भविष्य अवलंबून असतं! आज आपण पुन्हा एकदा एकात्मतेचा अविष्कार घडवला आहे ! काहींना हा इव्हेंट वाटला होता ...काहींची तथाकथित विज्ञान निष्ठा याच्या आड आली होती...काहींना आपण फार पुरोगामी आहोत असे दाखवायची हौस वाटत होती, काहींना पंतप्रधानांच्या या ‘मूर्खपणाच्या व अविचारी आवाहनामुळे राष्ट्रीय ग्रीड फेल होईल व इस्पितळांत हाहाःकार माजेल’ अशी चिंता पडली होती आणि विशेष म्हणजे ती व्यक्त करणाऱ्यांत महाराष्ट्राचे मंत्रीही होते! तर काहींना आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात सुरक्षित राहून, रस्त्यावरच्या वा ज्यांच्या घरात करोनामुळे मृत्यू झाले आहेत वा बाधित रुग्ण आहेत त्यांचा कळवळा आला होता [म्हणजे पुन्हा भावनांचाच मामला बरे का! पण त्या भावना श्रेष्ठ आणि या लहानशा कृतीतून ‘आम्हीही तुमच्या बरोबर आहोत’ असा विश्वास प्रत्यक्ष झटणाऱ्यांना देऊन एकात्मतेचा अविष्कार घडवू पाहणाऱ्यांच्या भावना म्हणजे मूर्खपणा] पण या सगळ्यांची जनतेबरोबर असलेली नाळ किती तुटलेली आहे हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. करोडो भारतीयांनीच नव्हे तर सार्क देश व अन्य काही देशांनाही आपल्या पंत प्रधानांच्या आवाहनात अर्थ वाटला आणि लहान -थोर, आबाल- वृद्ध, श्रेष्ठ- कनिष्ठ अशा सगळ्या भेदांच्या पलिकडे जाऊन त्यांनी हा आशेचा दीप घरा-घरांत व मना-मनांत लावला. ही कृती अर्थातच प्रतीकात्मक होती! याने करोना पळून जाणार नाहीय, ती लढाई आपण एक दिवा लावल्याने संपणार नाहीय ही जाणीव सगळ्यांनाच होती. पण ती लढाई आपण जिंकू शकतो, आपण सगळे एक आहोत हा विश्वास या दीपांनी निश्चितपणे जागवला. मांगल्याची पेरणी त्यांनी निश्चितपणे केली. मात्र एक गोष्ट सखेदपणे नमूद करावीशी वाटते. ९ मिनिटे घरातले फक्त दिवे बंद केल्याने ग्रीड फेल होत नाही हे माहित असताना तथाकथित समाज धुरिणांनी, महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. यातही राजकारण आणणे व जनतेची दिशाभूल करणे हे कितपत धर्म्य होते? साऱ्या देशाची धुरा सांभाळणाऱ्या पंतप्रधानांना एवढा साधा विषय समजत नाही आणि ते अविचारीपणाने काहीही ‘इव्हेंट’ घोषित करतात अशी टीका करणाऱ्या या टीकाकारांना आपण देशाच्या सर्वोच्च नेत्याचा व पर्यायाने त्यांना त्या पदावर निवडून देणाऱ्या देशाच्या करोडो नागरिकांचा अपमान करत आहोत हे लक्षातच आले नाही? का मोदीद्वेष त्यांचा विवेक नष्ट करून गेला? लोकशाहीत विरोध असावा ...तो आवश्यकही असतो. पण प्रत्येक बाबतीत विरोध? लोकांच्या भावनांचा जराही आदर न करता विरोध? ही कुठली लोकशाही? आज मला पत्रकारितेचे माझे आदरणीय सर आणि ज्येष्ठ पत्रकार -लेखक कै प्रभाकर पाध्ये यांची आठवण होते आहे. त्यांनीच सांगितलेली एक आठवण पुढे देते आहे. प्रारंभीच्या काळात ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते. त्यामुळे गांधीजींनी १९४२ मध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून जेव्हा ब्रिटिशांना ‘चले जाव’ची हाक दिली, तेव्हा तो मेळावा आधीच उधळून लावण्यासाठी, गांधीजींवर मारण्यासाठी पाध्ये सर आणि आणखी काही कॉम्रेड सडके टोमॅटो, अंडी घेऊन तिथे गेले होते. पण तिथे गांधीजींना मानणारा तो अफाट जनसमुदाय पाहिल्यावर ते सगळे तसेच उलट्या पावली परत आले, कारण त्यांना वाटले की आपल्याला गांधीजी मान्य नसतील पण त्यांना मानणाऱ्या त्या अफाट जनसमुदायाच्या भावनांचा अनादर करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही..... ही प्रगल्भता मोदी द्वेषाची कावीळ झालेले कधी दाखवणार? आजचा एक दिवा तरी त्या कामी येवो हीच इच्छा!

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Comments


bottom of page