मुक्तात्मा
- jayashreedesaii
- Jul 31, 2020
- 3 min read
एखादा दिवस आम्हा पत्रकारांच्या आयुष्यात खूप साऱ्या बातम्या घेऊन येतो . २८ फेब्रुवारीचा दिवस तसा होता. आदि शंकराचार्यानी सुमारे पाचव्या शतकात स्थापन केलेल्या, सर्वोच्च मानल्या गेलेल्या कांची कामकोटी पीठाचे ६९ वे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांनी त्या दिवशी देह ठेवला. लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी अत्यंत भावाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसमधील बडं प्रस्थ असलेल्या पी चिदंबरम यांच्या मुलाला कार्तीला त्याच दिवशी अटक झाली!
श्रीदेवी यांना असलेलं ग्लॅमरचं वलय व कार्ती यांच्या अटकेला असलेलं राजकीय वलय यात एका सुधारणावादी संताचं आपल्यातून जाणं हे हेडलाईन तर नाहीच ठरू शकलं, पण दुसऱ्या दिवशी त्यावर मोठ्या वर्तमानपत्रांत ना कुठे अग्रलेख आला ना एखादे स्फुट. आज पत्रकारिता व समाज ज्या दिशेने चालला आहे ते बघता ते स्वाभाविकही म्हणावे लागेल. मात्र खरं तर त्यांची व त्यांच्यासारख्या सुधारणावादी संतांची गरज आजच समाजाला सर्वाधिक आहे!
मला त्यांना भेटायचा योग आला तो १९८० च्या दशकामध्ये. तेव्हा ते मुंबई दौऱ्यावर आले होते. तत्कालीन राज्य मंत्री डॉ श्रीकांत जिचकार यांच्या बंगल्यावर उतरले होते. तो काळ सगळ्या देशासाठीच अत्यंत तणावाचा होता. देशातील अनेक राज्यांत होणारे जातीय -धार्मिक दंगे, शाही इमामांचे सततच निघणारे फतवे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मीनाक्षीपुरमच्या सामूहिक धर्मांतराची ताजी असलेली जखम या पार्श्वभूमीवर मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती. एक तर ते सर्वोच्च पीठ मानले जाते आणि दुसरे म्हणजे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती हे असे संत होते की ज्यांची निवड त्यांच्यातले तीन गुण पाहून तत्कालीन शंकराचार्य चंद्राशेखरेन्द्र सरस्वती यांनी केली असे सांगितले जात होते. ते तीन गुण असे होते की जन आकर्षण, धन आकर्षण व जल आकर्षण. ते वेद विद्या पारंगत तर होतेच. त्यांचे अध्यात्मिक गुरु महा पेरीयावा यांच्यासोबत त्यांनी सारा देश उभा आडवा पायी पिंजूनही काढला होता. त्यामुळे त्यांना देशाची नाडी बरोब्बर समजली होती आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्यात हे तीन गुण होते! या पहिल्या गुणाचा अर्थ होता की ते लोकांना आकर्षित करू शकत होते. दुसऱ्या गुणाचा अर्थ होता की ते निधी उभा करू शकत होते आणि तिसऱ्या गुणाचा अर्थ होता की त्यांच्याकडे अशी सिद्धी होते की ते ज्या दुष्काळग्रस्त भागात जात तिथे पाऊस पडत असे.ते जलाला आकर्षून घेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातले लोक त्यांना आवर्जून बोलावत असत.
मुंबईतसुद्धा त्यांच्या दर्शनासाठी जिचकारांच्या बंगल्यावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यात अगदी समाजातल्या सर्व वर्गातले, जातींचे लोक होते. या सगळ्यांना आशिर्वाद देता देताच त्यांनी मला मुलाखतही दिली. ते एका अत्यंत कर्मठ अशा कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य होते पण त्यांचे प्रागतिक विचार त्यांच्या सगळ्याच उत्तरांतून लक्षात येत होते. त्यातले एक उत्तर मात्र माझ्या मनावर कोरले गेले आणि आज ते सर्वात जास्त अंगीकारण्याची, त्यावर विचार होण्याची गरज आहे असे मला वाटते .
मी त्यावेळी वयाच्या बवीशी -तेविशीत असलेल्या भाबडेपणा व उसळत्या रक्ताच्या जोरावर त्यांना विचारले होते की ख्रिश्चन, मुस्लीम या सगळ्यांकडूनच भारतात विविध ठिकाणी सामूहिक धर्मांतरं होताहेत, परदेशातून ख्रिश्चन मिशनरयांना प्रचंड पैसा येतो आहे. देशात कुठेही मुस्लीमांविरुद्ध खुट्ट कुठे काही झालं तर शाही इमाम फतवे काढतात, तिकडून पोप ख्रिश्चनांच्या बाजुने बोलतात. मग तुम्ही जर शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे नेते असाल तर तुम्ही कधीच हिंदूंच्या बाजुने आवाज का उठवत नाही? बोलत का नाही? हिंदूंची बाजू कोण घेणार?
एरवी मितभाषी असलेले जयेंद्र सरस्वतीजी यावर मात्र ताडकन उत्तरले की नाहीच प्रतिक्रिया देणार. कुणीच द्यायला नाहीच पाहिजे. कारण हिंदू धर्म हा कधीही या अन्य धर्मांप्रमाणे प्रतिक्रियावादी धर्म नव्हता आणि म्हणूनच तो आजतागायत टिकून राहिला आहे ....त्याचे हे जे स्वरूप आहे ते टिकलेच पाहिजे.
त्या वयात व त्या काळच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मला हे उत्तर जरी आवडले होते तरी तेवढेसे पटले नव्हते. पण नंतरच्या काळात, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्यांच्या कार्यातून तेच उत्तर अधिक स्पष्ट केले.
त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही, निवेदने दिली नाहीत, फतवे काढले नाहीत. पण त्यांनी अत्यंत कर्मठ असलेला, परिणामी ब्राह्मणापुरताच बंदिस्त असलेला मठ सर्व सामान्यांपर्यंत नेला. ते दलित वस्त्यांपर्यंत गेले. तिथे फिरले. त्यांच्या अडचणी व सामूहिक धर्मान्तरामागची त्यांची अगतिकता ओळखून त्यांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात मोठे काम उभे केले. आज एक डीम्ड युनिव्हर्सिटी मठातर्फे चालवली जाते. पौरोहित्याचे वर्ग दलितांसाठीची चालवले जातात ते ही फक्त कांचीपुरममध्येच नव्हे तर केरळ व अन्य दक्षिणी राज्यांतही चालवले जातात. या सामाजिक कामांसाठी त्यांनी १९८७ मध्येच ‘जन कल्याण जागरण’ या नावाने एक मंच उभा केला. लोकांची सेवा व जन जागरण हे दोन मुख्य उद्देश त्यामागे होते. आज हा मठ ४४ इस्पितळे , असंख्य शाळा, डीम्ड युनिव्हर्सिटी तर चालवतोच आहे, पण विशेष म्हणजे दलितांचे अनेक पूजाविधी, परंपरा यांचा संकर हिंदू धर्माशी घालून देण्याचे, अनेक लोक कलांच्या पुनरुज्जीवनाचे कामही मठाने केले आहे. जयेंद्र सरस्वतीजी कैलास मानस सरोवारालाही गेले. तिथे त्यांनी आदि शंकराचार्यांचा पुतळाही बसवला. तिथे जाणारे ते आदि शंकराचार्यानंतरचे पहिले शंकराचार्य ठरले! अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा हिंदूंच्या बाजुने सुटावा यासाठीही त्यांनी अत्यंत सक्रिय भूमिका बजावली होती .
एकूणच सनातन धर्माला कर्मठतेच्या विळख्यातून बाहेर काढून लोकाभिमुख करण्याचे मोठे श्रेय त्यांच्याकडे जाते. कधी ते वादग्रस्तही ठरले. सत्ताधीशांच्या घाणेरड्या राजकारणातले प्यादे बनलेलेही दिसले. पण त्यांनी त्याची कधी फिकीर केली नाही वा त्याचा कधी राग धरलेला दिसला नाही. ते एक व्यापक ध्येय धरून चालले होते असे दिसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांच्या अंतरात्म्याशी एकनिष्ठ होते. रूढी,परंपरा,त्यांचे पूर्व सुरी आणि राजकारणी ....हे कुणीच त्यांच्या आड येऊ शकले नाहीत.
असा हा मुक्तात्मा आज पंचत्वात विलीन झाला !
आजच्या असहिष्णू वातावरणात त्यांच्या त्या प्रेरक शिकवणीच्या अंमलबजावणीची तीव्र गरज अधोरेखित करून गेला !
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
Comentarios