मूर्खांचा बाजार !
- jayashreedesaii
- Jul 31, 2020
- 2 min read
मूर्खांचा बाजार !
अत्यंत घातक अशा तिसऱ्या टप्प्यात करोनाचा प्रवेश होऊच नये म्हणून पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद देत संपूर्ण भारताने काल जो कडकडीत ‘जनता कर्फ्यू’ पाळला आणि संध्याकाळी पाच वाजता आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व क्षेत्रांतील विशेषतः वैद्यकीय, सफाई आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या टाळ्या वाजवल्या किंवा शंख-घंटा नाद केला, त्या बद्दल मी काल संध्याकाळी लिहिलेली पोस्ट रात्रीच परत घ्यावी असं येणाऱ्या बातम्यांवरून वाटू लागलं होतं....मन खरोखर विषण्ण झालं होतं!
मुंबईत काही ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता ढोल ताशे लावून मिरवणूक काढली गेली, त्यात आबालवृद्ध सगळेच सामील झाले, सहभागी लोक आनंदाने नाचत होते....काही ठिकाणी टाळ्या वाजवत लोकांनी भर रस्त्यावर गरबा खेळला ...काही मोठ्या गृह वसाहतींमध्ये लोकांनी संध्याकाळी जल्लोषात गेट टुगेदर्स केली ...सामूहिकरित्या टाळ्या वाजवल्या..घंटा नाद केला....काही मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा केला गेला, त्यामुळे पोलिसांना मुख्य मौलवीं ना व तेथे उपस्थित नमाजींना अटक करायची वेळ आली.... पंतप्रधानांच्या गुजरातमधून आलेले कालच्या जल्लोषाचे व्हिडियो तर कपाळावर हात मारून घ्यावा असे आहेत. थोडक्यात सांगायचं तर आपल्या सुरक्षेसाठी योजण्यात आलेल्या उपायाच्या आपण अक्षरशः चिंधड्या उडवल्या ....
आपण मूर्ख आहोत का?
चुकलं...हा प्रश्नच बरोबर नाही ...आहोतच!
अन्यथा संध्याकाळी पाच वाजता स्वतःच्या घराच्या बाल्कनीत/ खिडकीत येऊन टाळ्या वाजवा असं आवाहन असताना व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांपासून ते महानायकासकट सर्वच सेलेब्रिटीज तोच आदर्श घालून देत असताना, आपण रस्त्यावर ती विजय मिरवणूक असल्यासारखे नाचू कसे शकतो? आवाहन सुद्धा खड्ड्यात जाऊ दे, आपला कॉमन सेन्स सुद्धा आपण खुंटीला टांगून ठेवला आहे का?
करोना व्हायरस बद्दल इतकी जन जागृती चालू आहे, चीन आणि इटलीमध्ये त्याने माजवलेला हाहाःकार आपण बघतो आहोत, आपल्याकडे गरज पडली तर आवश्यक तेवढी चाचणी केंद्रं व आवश्यक त्या संख्येत व्हेंटीलेटर्स सुद्धा उपलब्ध नाही आहेत हे साऱ्याच यंत्रणा कोकलून सांगत आहेत, वृद्ध व लहान मुलांना, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदय विकार तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांना जास्त धोका आहे हेही सांगितलं जात आहे आणि तरीही लहान मुलांसकट म्हाताऱ्यापर्यंत भर रस्त्यात आपण ‘मास्क’ सुद्धा न घालता नाचतो? वृद्ध लोक ‘टाईम पास’ म्हणून जी कामं एक महिन्याने केली तरी चालतील त्या कामांसाठी बँकांमध्ये जाऊन स्वतःचा व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात? तरुण मुलं नाक्या नाक्यावर जमून ‘एन्जॉय’ करतात? सुट्ट्या मिळाल्या म्हणून लोक गावी जायला निघतात? परप्रांतातले लोक गावी जाण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी करतात? आणि सर्वात भीषण म्हणजे ज्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारला आहे ते चक्क घरातून पसार होऊन प्रवास करतात? किंवा दुसरं टोक म्हणजे असा शिक्का मारलेल्या लोकांना त्यांच्या सोसायट्यांकडून त्यांच्या घरातच जाऊ दिलं जात नाही?
काय मूर्खांचा बाजार आहे!
स्वतःबरोबर सगळ्यांना घेऊन मरायचं ठरवलंच आहे का आपण?
इटलीत आज रोज ८०० लोक मृत्युमुखी पडतायत ....
भारतात हे प्रमाण इथल्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, प्रचंड लोकसंख्या व नागरी सुविधांचा अभाव लक्षात घेतला तर किती तरी जास्त असेल हे अगदी उघड आहे . ते होऊ नये म्हणून पूर्ण लॉक डाऊन, रेल्वे, बस बंद वगैरे सारखे गंभीर उपाय योजले गेले आहेत ....पण तरीही आपल्याला या विषयाचे गांभीर्य समजलेलेच नाहीय का?
३१ मार्चला सुद्धा ही लढाई संपणार नाहीय. पुढचा टप्पा कदाचित १५ एप्रिलपर्यंतचा असेल....आपला संयम आत्ताच संपला असेल तर पुढे कसा तग धरणार?
पुण्यात त्याने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाही आहे अशी भीती व्यक्त केली जाते आहे. मुंबई फार दूर नाही!
आपण एका भयानक बॉम्बवर बसलो आहोत. तो कधी फुटणार एवढीच प्रतीक्षा आहे. त्याला निकामी करण्याचे किंवा किमान तो स्फोट लांबणीवर टाकण्याचे प्रशासनाचे, आपल्या वैद्यकीय व्यवस्थेचे प्रयत्न प्रचंड कौतुक करावेत असेच आहेत. पण आपण त्याला चूड लावण्याचे पाप नको करूयात....
आत्ताच ठरवा --आपला स्वतःचा किंवा आपल्या जिवलगाचा मृत्यू आपणच खेचून आणणार? की स्वस्थ घरी बसणार?
जयश्री देसाई
-----------------------------------
Comments