सकाळचे फिरणे !
- jayashreedesaii
- Jul 30, 2020
- 2 min read
Updated: Jul 31, 2020
सकाळी फिरायला जाण्याची मोठी गंमत असते. उठवत नसतं ...कंटाळा आलेला असतो ...आज नको..उद्यापासूनच जाऊ या असा विचार शंभरदा तरी मनात आलेला असतो...पण तरीही कसं तरी एकदाचं अंथरूण फेकून आपण चालायला बाहेर पडतो...मात्र गंमत म्हणजे चालायला लागल्यावर अगदी पाच मिनिटांतच आपण हा कंटाळा पूर्ण विसरून जातो. पहाटेचा सुखद गारवा...अगदी खेड्यातल्या इतकी नसली तरी बऱ्यापैकी शांतता... शाळेत जाणाऱ्या मुलांचा गोड चिवचिवाट, मस्ती...दूध आणि पेपर टाकणाऱ्यांची लगबग.....कामावर जाणाऱ्यांची गाडी गाठण्याची घाई, त्रासलेले चेहेरे...कुठून तरी ऐकू येणारी गाण्याची लकेर...आकाशात झेपावणारी पक्ष्यांची रांग.....कुठून तरी ऐकू येणारी त्यांची गोड साद....झाडांवरून उगाचच पळापळ करणाऱ्या चिमुकल्या खारूताई ...हे सारं त्या सकाळच्या चालण्यात रंग भरत असतं...
कुणी धावत असतं... कुणी आपल्या कुत्र्यांना फिरवायला घेऊन आलेलं असतं....कुणी कानात बोळे अडकवून आपल्याच धुंदीत एकटंच चालत असतं, कुणी चालणं कमी... एकत्र गप्पांचा फड जमवून गप्पा ठोकत असतं...कुणी थोडं चालून मग एका ठिकाणी बसून पोथी वाचत असतं, तर कुणी सासुरवाशिणी चालता चालताच घरची रडगाणी ...गाऱ्हाणी एकमेकींना ऐकवत असतात ....कुणी अशा ठिकाणी मिळणारे वेगवेगळे ज्युसेस पीत असतात, तर काही आजोबांचे गट चक्क एक फेरी झाली की कृतकृत्य झाल्यासारखे गरमागरम बटाटा वड्यांवर ताव मारत असतात...एकूणच सकाळची ही प्रभात फेरी म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर एक अतिशय ‘हॅपनिंग’ गोष्ट असते... यात काही शास्त्रशुध्द व्यायाम करणारेही असतात... पण एकूणच आपल्या खास भारतीय स्वभावाप्रमाणे अशा वेळी पायांपेक्षा तोंडंच जास्त चालताना दिसतात आणि मजा वाटते.
आपण रोज रोज ठराविक वेळी जायला लागलं की ते चेहेरेही ओळखीचे व्हायला लागतात. त्या चेहेरयांकडे बघून काही अंदाज बांधता यायला लागतात. मला आठवतंय मी लहान असताना खूप पुस्तकं वाचायची आणि स्वतः लेखक असलेले माझे वडील मला सांगायचे की तू पुस्तकं खूप वाचतेस...जरा माणसं वाचायला शिक. आता माणसं वाचायचं म्हणजे काय करायचं? तर त्यांचे चेहेरे, त्यांच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बघून, त्यांची देहबोली बघून, त्यांच्या बोलण्याची ढब बघून ते कोणत्या भागातले असतील, कोणत्या आर्थिक गटातले असतील, त्यांचं चरितार्थाचं साधन काय असेल, त्यांचा साधारण स्वभाव कसा असेल याचा अंदाज बांधायचा. मला हे खूप गंमतीशीरही वाटलं आणि आव्हानात्मक सुद्धा. मी ते करायला लागले. मग तो चाळाच लागला. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मी जे अंदाज बांधले होते त्यांची खातरजमा करून घ्यायला लागले. ते बहुतांशी बरोबर येतायत म्हटल्यावर माझा उत्साह आणखीच वाढला.
सकाळी चालता चालता असा चाळा लावून घेतला किंवा असा खेळ करत बसलं तर मग सकाळचं ते फिरणं म्हणजे केवळ फिरणं राहत नाही. तो मानवी शोधाचा एक प्रवास बनतो. एक असा प्रवास, ज्याला आरंभही नाही आणि अंतही नाही. पण तरीही हाती काही तरी लागण्याची शक्यता मात्र पुरेपूर!
मुळात, दुसऱ्याची मनं वाचण्याची कला अवगत होणं हे किती महत्वाचं आहे ना? आजच्या आपल्या तणावपूर्ण आयुष्यात आपण आपल्याच मुलांची मनं नाही वाचू शकत आहोत. मुलांनी आत्महत्येसारखं पाऊल उचललं तर आपण जागे होतो. त्या ऐवजी आधीच ही कला अवगत करून घेतली तर?
करून बघा ! मजा येते!
----------------------------------------
Comments