स्वप्नपूर्तीच्या दिशेने!
- jayashreedesaii
- Aug 7, 2020
- 2 min read
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात ओढलं जातं आहे. एक पत्रकार म्हणून अयोध्या आंदोलन ‘कव्हर’ करताना मनात कोरले गेलेले प्रसंग पुन्हा पुन्हा मनात तितक्याच ताजेपणाने जिवंत होत आहेत, अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, आचार्य गिरीराज किशोर, तत्कालीन सरसंघचालक रज्जू भैय्या, राजमाता विजयाराजे शिंदे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदि असंख्यांचे स्मरण होते आहे. तेव्हाची प्रक्षुब्ध अयोध्या आणि आताची सजलेली अयोध्या हा फरक एका खूप मोठ्या कालखंडाची, लढ्याची, वैध-अवैध उतार-चढावांची, राजकीय खेळ्यांची कहाणी तर सांगतो आहेच, पण त्याच बरोबर तो एका असामान्य जिद्दीची, निर्धाराची, श्रद्धेची कहाणीही कथन करतो आहे.
राम हा इतिहास पुरुष की केवळ काव्य पुरुष?, रामाचा जन्म खरंच तिथेच झाला होता का असल्या सगळ्या खोडसाळ प्रश्नांना, चर्चांना जराही धूप न घालत या देशातील हिंदू समाजाने हा जो लढा लढला, ज्या जिद्दीने लढला तो निःसंशय प्रेरक आहे. आपल्याही मनात जिद्दीचे स्फुल्लिंग चेतवायला समर्थ आहे.
राम खरा होता की नाही याचेही अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यावर खूप शोध आत्तापर्यंत झाला आहे. राम सेतू हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. तरीही आज, अगदी भूमी पूजनाच्या तोंडावरही हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे खेदजनक आहे. कारण राम होता, पैगंबर होता, ख्रिस्त होता हे श्रद्धेचे विषय आहेत. त्याचा ऐतिहासिक पुरावा कसा मिळणार? असे प्रश्न विचारणाऱ्याना रामाचे ‘बर्थ सर्टफीकेट’ अपेक्षित आहे का? असे प्रश्न विचारताना हे कसे लक्षात घेतले जात नाही की आजही तो या देशाच्याच नव्हे तर अन्य काही देशांतील जनतेच्या मनातही जिवंत आहे. आज चंगळवादाच्या, पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाच्या मागे लागलेल्या या देशातही आसेतु हिमाचल सर्वाना जोडणारा धागा राम हाच आहे! आणि दुसरं म्हणजे वाद हा होता की ती राम जन्म भूमी आहे की नाही? तिथे असलेले मंदिर पडून बाबरी मशीद बांधली गेली होती का? तेथे झालेल्या व्यापक उत्खनना नंतर मिळालेल्या पुराव्यांवरून हे निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ९ नोव्हेंबरला त्यावर निकालाची मोहर सुद्धा उठवली आहे. असे असताना भूमी पूजनाच्या तोंडावर पुन्हा बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न कशासाठी?
१९८४ साली विश्व हिंदू परिषदेने सुरु केलेल्या या आंदोलनाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल हे आंदोलन सुरु करणाऱ्यानाही वाटले नसेल. त्यामुळेच भाजपा सुद्धा प्रारंभी या मंदिर आंदोलनात उतरला नव्हता! मात्र या देशातले लाखो लोक स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यात उतरले. अनेकदा तेथे नागरी उठावासारखी परिस्थिती उद्भवली. लोकांनी काठ्या -बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. पण राम जन्म भूमीवर रामाचे भव्य मंदिर झालेच पाहिजे हा ध्यास सोडला नाही. टीका करणाऱ्या विद्वानांनी कधी तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन या जनभावनेचं विश्लेषण सुद्धा करावं की!
पुरावेच मागायचे झाले तर सर्वच धर्मांच्या सर्वच प्रेषितांच्या बाबत मागता येतील .... त्यावर वादही रंगतील....पण त्याने त्या त्या समुदायांच्या मनातील श्रद्धा हलेल?
याचं उत्तर निसंदिग्ध ‘नाही’ असं आहे ...आणि म्हणूनच हे तथाकथित विचारवंत एकेका पक्षापुरते वा छोट्या समाजापुरते मर्यादित राहत आहेत आणि राम आजही या देशातल्या करोडोंच्या हृदय सिंहासनावर राज्य करतो आहे!
ज्या जनतेचं नेतृत्व करायची हौस आहे त्या जनतेशी कधी तरी नाळ जोडावी की!
------------------------------
Comments